महाराष्ट्र
33
10
अहमदनगर जिल्हा बँक आणि वर्कवेल इन्फोटेक कंपनीला नोटीस
By Admin
अहमदनगर जिल्हा बँक आणि वर्कवेल इन्फोटेक कंपनीला नोटीस
कर्मचारी भरतीमधील घोटाळ्याबाबत याचिका
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचारी भरतीमधील घोटाळ्याबाबतच्या याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे सुटीतील न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी बँकेचे संचालक मंडळ तसेच वर्कवेल इन्फोटेक कंपनीला प्रतिवादी करण्याची परवानगी देऊन त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. वरील बँकेत लिपिकांच्या ६९० जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली होती. ती भरती प्रक्रिया वर्कवेल इन्फोटेक प्रा. लि. या कंपनीमार्फत राबविण्यात आली होती.
काय होती याचिका ?
भरतीमध्ये ऑनलाइन परीक्षा व मुलाखत होऊन अंतिम यादी जाहीर झाली आहे. सदर भरतीत आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. वेळापूर (ता. कोपरगाव) येथील विशाल गोरे व राजेंद्र वैराळ यांना ऑनलाइन परीक्षेतील उत्तरांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्या उत्तरपत्रिकेनुसार कमी गुण मिळाले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी बँकेच्या कार्यकारी मंडळाकडे अर्ज करून उत्तरपत्रिकेची कॉपी मिळण्याची वारंवार विनंती केली. मात्र त्यांना ती दिली नाही.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनाही अर्ज करून निदर्शनास आणून दिले. त्यांनीही काहीही कारवाई केली नाही. म्हणून वरील दोघांनी अॅड. नीलेश भागवत व अॅड. योगेश खालकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली.
टास्क फोर्सच्या सूचनांचे पालन केले नाही
याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सदर भरतीमध्ये गुणवत्ता यादी जाहीर करणे अपेक्षित असताना, बँकेने गुणवत्ता यादी जाहीर न करता फक्त आसन क्रमांक प्रसिद्ध करून मुलाखत व अंतिम यादी प्रसिद्ध केली.
भरतीमध्ये बँकेचे चेअरमन व संचालक मंडळाने त्यांच्या मर्जीतील विद्यार्थ्यांना जास्त गुण देऊन मुलाखतीसाठी पात्र केले. ही भरती प्रक्रिया केवळ देखावा असून, बँकेचे चेअरमन व संचालक मंडळाच्या संपर्कातील उमेदवारांनाच पात्र केलेले आहे. कुठलेही आरक्षण लागू केले नाही.
सहकारी बँकांसाठी राज्यस्तरीय टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही. बेकायदेशीर झालेली संपूर्ण भरती प्रक्रिया व उमेदवारांची निवड रद्द करण्याची विनंती याचिकेत केली आहे. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील एस. पी. सोनपावले यांनी काम पाहिले.
Tags :

