महाराष्ट्र
32575
10
शासकीय पहिले वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगरला साकारणार
By Admin
शासकीय पहिले वैद्यकीय महाविद्यालय अहिल्यानगरला साकारणार
जागा निश्चितीसाठी मंत्र्यांची समिती गठित; उभारणीसाठी ४८५ कोटी रुपयांचा निधी मंजूर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहिल्यानगर
जिल्ह्यातील पहिले प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी ४८५.०८ कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. मात्र या महाविद्यालयासाठी जागा उपलब्ध झालेली नसून, त्या जागेच्या निश्चितीसाठी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने मंत्र्यांची समिती गठित करण्यात आली आहे. १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व त्यासंलग्नित ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने उभारण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय २३ मे रोजी जारी करण्यात आला आहे.
राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील पालघर, गडचिरोली,
अमरावती, वाशिम, जालना, बुलढाणा, ठाणे, भंडारा, वर्धा व हिंगोली या १० जिल्ह्यांध्ये यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आली होती. परंतु नगर जिल्ह्यात सुयोग्य जागेअभावी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मान्यता देण्यात आली नव्हती. त्यानंतर पुण्यश्-लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यातील जनतेस अधिकाधिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे महाविद्यालय व संलग्नित +
४३० रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास चौंडी येथे ६ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीस मंजुरी देण्यात आली होती.
या मंजुरीनंतर याबाबतचा शासनादेश २३ मे रोजी जारी करण्यात आला आहे. त्यात महाविद्यालय उभारणीसाठी ४८५. ०८ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. महाविद्यालयासाठी सुयोग्य जागेची निवड करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने मंर्त्यांची समिती गठित करण्यात आली आहे. सदर जागा महसूल विभागाच्या सहमतीने संबंधित जिल्हाधिकारी
यांच्यामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागाकडे निःशुल्क हस्तांतरित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकानुसार या महाविद्यालयासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा सामान्य रुग्णालय, आवश्यक स्थावर जंगम मालमत्ता व मनुष्यबळासह तात्पुरत्या स्वरूपात किमान ७ वर्षासाठी वैद्यकीय शिक्षण विभागास निःशुल्क वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच या महाविद्यालयाच्या उभारणीसाठी प्रशासकीय इमारत, चिकित्सालयीन विभाग, रुग्णालयीन इमारत, अधिकारी-कर्मचारी आवास आणि विद्यार्थी वसतिगृह यांच्या बांधकामास तसेच यासाठी लागणारे अधिकारी-कर्मचारी यांची पदे भरण्यासही या शासनादेशाद्वारे मान्यता देण्यात आली आहे.
Tags :

