08-Jan-2026
स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलेला व प्रतिभेला वाव मिळतो- प्रा. डॉ. लक्ष्मणराव बिटाळ
भालेश्वर विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ
पाथर्डी प्रतिनिधी:
भालगाव येथील भालेश्वर विद्यालयात बुधवार दि. ०७ जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास शिक्षण, साहित्य व अध्यात्म क्षेत्रातील मान्यवरांसह पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. श्री. लक्ष्मणराव बिटाळ (मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह, शेवगाव) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून ह. भ. प. नवनाथ महाराज शास्त्री (महंत, मच्छिंद्रनाथ गड, भालगाव), सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी व गझलकार श्री. संजय पठाडे तसेच प्रा. श्री. अशोक आहेर (सहप्रमुख, कर्मयोगी आबासाहेब काकडे शिक्षण विभाग) उपस्थित होते. याशिवाय विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. हनुमान गोर्डे, श्री सुदाम तात्या खेडकर, श्री बाळासाहेब खेडकर, श्री भागवत खेडकर, श्री सचिन खेडकर, श्री सर्जेराव सुपेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाची प्रसन्नता वाढवली.
वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक व गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. यामध्ये एकल नृत्य, समूह नृत्य, नाटिका, गीतगायन व संगीत नृत्य यांचा समावेश होता. याशिवाय गणित व विज्ञान अध्यापक संघाच्या उपक्रमांतर्गत आयोजित स्पर्धा, खो-खो, कबड्डी, कुस्ती स्पर्धा, चित्रकला प्रदर्शन, रांगोळी, मेहंदी व वक्तृत्व स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसमवेत मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी व पारितोषिके प्रदान करण्यात आली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. हनुमान गोर्डे यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यालयाच्या शैक्षणिक, क्रीडा व सहशालेय क्षेत्रातील यशाचा चढता आलेख मांडला तसेच शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्री. लक्ष्मणराव बिटाळ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कष्ट, चिकाटी व जिद्द या गुणांच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते, असे स्पष्ट केले. सातत्यपूर्ण मेहनतीतूनच उत्तम व्यक्तिमत्त्व घडते, असे त्यांनी नमूद केले.ह. भ. प. नवनाथ महाराज शास्त्री यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये, शिस्त व संस्कार यांचे महत्त्व सांगितले. प्रमुख अतिथी श्री. संजय पठाडे यांनी आपल्या काव्यमय शैलीत ग्रामीण जीवनाचे वास्तव उलगडून सांगत आई-वडील व गुरु यांचा आदर्श घेऊन जीवनात प्रगती साधण्याचा संदेश दिला.
या प्रसंगी एस एस सी बॅच 2010-11 चे प्रतिनिधी म्हणून विद्यार्थी श्री सचिन खेडकर, श्री राम सुपेकर, ज्ञानेश्वर सुपेकर,गोकुळ कासुळे तसेच डॉ. प्राचार्य शिवाजीराव घुंगरड यांनी cctv कॅमेरा साठी भरघोस आर्थिक मदत केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. भाऊसाहेब शिंदे यांनी केले तर समन्वयक श्री. दिगंबर नजन यांनी आभार मानले.या प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.