महाराष्ट्र
08-Jan-2026
भारतीय ज्ञान परंपरा ज्ञानाबरोबरच संस्कारही शिकविते-प्रा. सुनील कुलकर्णी
आव्हाड महाविद्यालयात भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र
पाथर्डी प्रतिनिधी:
भारतीय ज्ञान परंपरेला १९६० च्या दशकापर्यंत मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला परंतु कालांतराने भारतीय ज्ञान परंपरेला महत्व येऊन आज नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरेचा समावेश करण्यात आला. भारतीय ज्ञान परंपरा ज्ञानाबरोबरच संस्कारही शिकविते, असे प्रतिपादन आग्रा येथील केंद्रीय हिंदी संस्थानचे निदेशक प्रा. सुनील कुलकर्णी यांनी केले. ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात केंद्रीय हिंदी संस्थान आग्रा व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतीय ज्ञान परंपरेच्या अनुषंगाने हिंदी व मराठी साहित्य या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड तर व्यासपीठावर जेष्ठ हिंदी साहित्यिक डॉ श्रीराम परिहार, प्रमुख अतिथी डॉ. दामोदर खडसे, प्राचार्य डॉ. बबन चौरे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या हिंदी अभ्यास मंडळाच्या अध्यक्षा डॉ. अपर्णा पाटील, डॉ. सुनील डहाळे, डॉ. फत्ताराम नायक, डॉ. संदीप, माजी प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, डॉ. अशोक डोळस आदी उपस्थित होते.
प्रा. कुलकर्णी पुढे म्हणाले, पूर्वी अभ्यासक्रमात पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव असल्याने भारतीय ज्ञानपरंपरा दुर्लक्षित राहिली. पाश्चात्य विचारधारेचा प्रभाव आपल्या खानपान, वेशभूषा, विचारसरणी यावर पडला. गुरुकुल शिक्षणपरंपरेत ज्ञानाबरोबरच संस्कार शिकविले जायचे. आज एआय च्या युगात ज्ञान मिळेल पण संस्कार मिळणार नाही. आज ज्ञानापेक्षाही संस्काराची सर्वात जास्त आवश्यकता आहे. आज प्रत्येक आजाराचे मुळ ताणतणाव असून साधना व मनधरणा तणावमुक्तीसाठी आवश्यक आहे. लिव्ह इन रिलेशनशिप सारख्या संकल्पनांना भारतीय ज्ञान परंपरा योग्य मानत नाही.
प्रमुख अतिथी दामोदर खडसे यांनी चर्चासत्रात मार्गदर्शन करतांना हिंदी भाषा घेऊन पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना असणाऱ्या करिअरच्या संधी यावर सखोल मार्गदर्शन केले. मानवी जीवनात ज्ञानाबरोबरच रोजगाराचेही महत्व असून रोजगाराशिवाय मनुष्य जगू शकत नाही. शून्याचा तसेच अपूर्णांक पद्धतीचा शोध ही भारताने जगाला दिलेली देणगी असून जगातील कोणतेही तंत्रज्ञान गणिताशिवाय अपूर्ण आहे. ज्ञान दुसऱ्याला सांगितल्याने विज्ञान होते, असे ते शेवटी म्हणाले.
बीजभाषक डॉ. श्रीराम परिहार यांनी भारतीय ज्ञान परंपरेचा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये समावेश करण्याबद्दलचे महत्व विषद केले. भारतीय ज्ञान परंपरेची मुळे भारतीय संस्कृतीत खोलवर रुजलेली असून हीच ज्ञानपरंपरा आपल्याला प्रकाशाकडे नेते. गुरूंच्या माध्यमातून ज्ञान परंपरा अविरत झिरपत असून आज आयुर्वेदाचा होत असलेला प्रसार भारतीय ज्ञानपरंपरेचा परिपाक आहे. स्वामी विवेकानंद यांनी १८९३ ला शिकागो धर्मपरिषदेत भारतीय ज्ञान परंपरेचे दर्शन जगाला घडविले. भारतीय ज्ञान परंपरा सात जन्मातही समजू शकणार नाही इतकी अनंत असून ही ज्ञान परंपरा संवेदनशील व चारित्र्यवान मनुष्य घडविते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बबन चौरे, सुत्रसंचालन डॉ. अशोक कानडे तर आभार प्रा. सलीम शेख यांनी मानले.