महाराष्ट्र
17-Jan-2026
योग्य नियोजनाने ग्रामीण विद्यार्थीही होऊ शकतात स्पर्धा परीक्षेत यशस्वी-अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत
बाबूजी आव्हाड महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
पाथर्डी प्रतिनिधी:
एमपीएससी व युपीएससी परीक्षेत यश मिळवण्यासाठी मराठी किंवा इंग्रजी माध्यम असा फरक नसून या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर पूर्ण क्षमतेने स्मार्ट वर्क केले पाहिजे. कोणत्याही अडचणीचे भांडवल न करता प्रामाणिकपणे या परीक्षांना सामोरे गेले तर यश नक्की मिळते. योग्य नियोजनाने ग्रामीण विद्यार्थीही कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात असे प्रतिपादन तेलंगना राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक महेश भागवत यांनी केले. ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व नगराध्यक्ष अभय आव्हाड तर व्यासपीठावर प्राचार्य डॉ. बबन चौरे, विवेकानंद विद्या मंदिरचे मुख्याध्यापक शरद मेढे उपस्थित होते.
महेश भागवत पुढे म्हणाले, या वर्षीपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम बदलला असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर वर्णनात्मक करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षांचा एकाच वेळी अभ्यास करणे शक्य होणार आहे. आज मोबाईल व इंटरनेट मुळे विद्यार्थ्यांमध्ये लिखाणाचे स्कील कमी झाले आहे. जोपर्यंत शिक्षणाचा पाया भक्कम होत नाही तोपर्यंत यश मिळणे दुरापास्त आहे. राज्य सरकारच्या धोरणानुसार नववी पर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचे दुष्परिणाम खूप झाले. विद्यार्थ्यांनी नेहमी उच्च ध्येय ठेवणे आवश्यक असून पदवीच्या प्रथम वर्षात आल्यानंतर लगेच युपीएससी परीक्षांची तयारी सुरु केल्यास अपेक्षित ध्येय लवकर गाठले जाऊ शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना परीक्षार्थी होणे खूप महत्वाचे असून तीन तासाच्या वेळेत सोडविलेला पेपर परीक्षा तपासणाऱ्या व्यक्तीच्या नजरेत भरायला हवा. यासाठी हार्ड वर्क पेक्षाही स्मार्ट वर्क करणे महत्वाचे आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर कोणीतरी आयडॉल आपल्यासमोर ठेवायला हवा. पाथर्डी तालुक्यातून युपीएससीचा टक्का वाढतोय ही आपल्यासाठी भुषनावह बाब आहे. आपल्याला कोणत्या क्षेत्रात करियर करायचे हे सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी ठरवणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षा ही खूप वेळखाऊ प्रक्रिया असून त्यासाठी संयम असणे खूप महत्वाचे आहे. प्रयत्नात सातत्य, सकारात्मक दृष्टीकोन, कठोर मेहनत व दुर्दम्य इच्छाशक्ती असल्यास कोणत्याही परीक्षेत प्राविण्य मिळविता येते. सध्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रचंड स्पर्धा आहे. प्रत्येकासाठी वेळ खूप मौल्यवान असून या क्षेत्रात करियर करायचे असल्यास दिवस रात्र एक करून अभ्यास करा, यश निश्चित मिळेल.
बाबूजी आव्हाड महाविद्यालयाने क्रीडा, स्पर्धा परीक्षा, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ बबन चौरे व सहकारी महाविद्यालयाची कामगिरी उंचावत आहेत असे ते शेवटी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बबन चौरे, सूत्रसंचालन डॉ. अभिमन्यू ढोरमारे तर आभार प्रा.दत्तप्रसाद पालवे यांनी मानले.